मुंबई । सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल; अशा शब्दात आज शिवसेनेने Shivsena भाजपला इशारा दिला आहे.
सध्या सुरू असणार्या कथित १०० कोटींच्या मागणीच्या वादावर आज शिवसेनेचे Shivsena मुखपत्र असणार्या दैनिक सामनात भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, परमबीर सिंग यांची राज्य सरकारने पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आहे. अॅण्टिलिया स्फोटके प्रकरणात फौजदार सचिन वाझे एनआयएच्या अटकेत आहेत. हे सर्व प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही व पोलीस खात्याचीच बदनामी झाली असे मानून सरकारने पोलीस आयुक्तांना हटवले. सिंग यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा उद्रेक समजू शकतो, मात्र शासनाच्या सेवेत अत्यंत वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीने असा सनसनाटी पत्रोपचार करणे नियमात बसते काय? गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहायचे व ते प्रसिद्धी माध्यमांना पोहोचवायचे हे शिस्तीत बसत नाही.
या अग्रलेखात पुढे नमूद केले आहे की, परमबीर सिंग हे नक्कीच एक धडाकेबाज अधिकारी आहेत. पण अॅण्टिलियाप्रकरणी त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केले. हे खरे असले तरी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने असे पत्र लिहून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. परमबीर सिंग यांचे म्हणणे असे की, गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला शंभर कोटी रुपये गोळा करून द्यायला सांगितले. मुंबईतील 1750 बार-पबमधून हे पैसे उभे करावेत असे गृहमंत्र्यांचे म्हणणे होते, पण गेल्या दीडेक वर्षात मुंबई-ठाण्यातील पब्स-बार कोरोनामुळे बंदच आहेत. त्यामुळे हे इतके पैसे कुठून गोळा होणार, हा प्रश्नच आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता स्पष्टच केले की, अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांप्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून समोर येत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्यासाठी हे असे आरोप केले आहेत. हे सत्य असेल तर भाजप या सर्व प्रकरणात परमबीर यांचा वापर सरकारच्या बदनामीसाठी करीत आहे. सरकारला फक्त बदनामच करायचे असे नाही, तर सरकारला अडचणीत आणायचे असे त्यांचे धोरण आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात व दोन दिवसांत परमबीर सिंग हे असे पत्र लिहून खळबळ माजवतात. त्या पत्राचा आधार घेऊन विरोधी पक्ष जो हंगामा करीत आहे हा एक कटाचाच भाग दिसतो.
महाराष्ट्राच्या संदर्भात कायदा-सुव्यवस्था वगैरे ठीक नसल्याचा ठपका ठेवायचा व राष्ट्रपती राजवटीचा हातोडा हाणायचा हेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे अंतिम ध्येय दिसते व त्यासाठी नवी प्यादी निर्माण केली जात आहेत. परमबीर सिंग यांचा वापर याच पद्धतीने केला जात आहे हे आता स्पष्ट दिसत आहे. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची मागणी कालपर्यंत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता. आज परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’ झाले आहेत व परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर निशाणा साधीत आहेत. महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे. एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये! अशा शब्दात आज शिवसेनेने Shivsena भाजपला इशारा दिला आहे.