Home Cities जळगाव माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम कालवश

माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम कालवश

0
139

नागपूर प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले.

डॉ. सुधीर मेश्राम हे ८ सप्टेंबर २०११ ते ७ सप्टेंबर २०१६ या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. अत्यंत करड्या शिस्तीचे आणि कामातील गुणवत्तेला प्राधान्य देणारे कुलगुरू म्हणून त्यांची ख्याती होती. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी पहाटे शेवटचा श्‍वास घेतला.

डॉ. सुधीर मेश्राम यांच्या रूपाने एक कर्तबगार व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. अमरावती येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मायक्रो-बायोलॉजीत एम.एस्सी. आणि नंतर पीएच.डी. पूर्ण केली. ते नागपुर विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विषयाचे विभागप्रमुख होते. त्यांनी या विषयात सखोल संशोधन केले होते. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाले होते. तर त्यांनी आपल्या संशोधनाचे काही पेटंट सुध्दा मिळविले होते.

यानंतर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू बनले. त्यांच्या काळात विद्यापीठात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रयोगशाळा ते जमीन हा प्रयोग देश पातळीवर वाखाणण्यात आला होता.


Protected Content

Play sound