मिताली राज ठरली १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू!

 

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.  हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात केवळ दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे!

 

याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. पण मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान देखील मिताली लवकरच मिळवेल, अशी प्रार्थना तिचे चाहते आता करत आहेत!

 

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीनं हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिनं हा मैलाचा दगड पार करताच बीसीसीआयनं ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

१० हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीनं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत ३१० सामने खेळले आहेत. त्यापैकी १० कसोटी सामने, २११ एकदिवसीय सामने तर तब्बल ८२ टी २० सामन्यांचा समावेश आहे. १९९९मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जवळपास २२ वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

 

यासोबतच मितालीच्या नावे अजून एक विक्रम प्रस्थापित आहे. क्रिकेटच्या इतिहासात मिताली सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. २००हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ हजार ९३८ धावांचा विक्रम तिच्या नावावर आहे. सर्वाधिक सलग १११ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा देखील विक्रम तिच्याच नावावर आहे.

Protected Content