पाचोरा प्रतिनिधी । बॅंक अधिकारी असल्याचे सांगुन आज (दि. २ मार्च) रोजी सायबर गुन्हेगारीचा एक प्रकार घडला असून अज्ञान चोरट्याने बँक खात्यातून ७२ हजार रुपये लंपास केले आहे. या घटनेसंदर्भात पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शहरातील शिवकाॅलनी रहिवासी तथा पिंपरखेड ता. भडगांव येथील आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले ब्रिजलाल नथुलाल पांडे (वय – ५७) यांचे मोबाईल (क्रं. ९८५००२५०२०) वर दि. २ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ९८८३२८७४७१ या क्रमांवरुन फोन आला. फोन करणाऱ्या इसमाने आपले नाव दिपक शर्मा असे सांगत मी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा येथुन बोलत आहे. आपले बॅंकेचे के. वाय. सी. अपडेट नसुन आपल्या खात्यातुन हजार रुपये कपात करण्यात आले असल्याचे सांगत आपले बॅंक खाते बंद होवु शकते. तुमच्या मोबाईलवर एक कोड नंबर आला असेल तो सांगा जेणेकरून आपले बॅंक खाते सुरु राहील. यावर ब्रिजलाल नथुलाल पांडे यांनी कोड नंबर सांगितला.
काही वेळातच ब्रिजलाल पांडे यांचे बॅंक खात्यातुन अनुक्रमे २५ हजार रुपये, १० हजार रुपये, १६ हजार रुपये, १ हजार रुपये व २० हजार रुपये असे ७२ हजार रुपये कपात झाले. ब्रिजलाल पांडे यांनी तात्काळ त्यांना आलेल्या क्रमांकावर फोन केला असता सदरील मोबाईल क्रमांक बंद होता. ब्रिजलाल पांडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात इसमा विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप पाटील हे करीत आहे.