जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या वादातून कोल्हे हिल्स परिसरात पाठलाग करून दोघांना बेदम मारहाण करणाऱ्या संशयित आरोपी अजय लक्ष्मण गरूड (वय-२४) रा. गेंदालाल मिल याला वर्षभरानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रहत्या घरातून आज १ मार्च रोजी अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
घटना अशी आहे की, वर्षभरापुर्वी जळगाव रेल्वे स्थानकाजवळ १४ मार्च २०२० रोजी वाघ नगरात राहणाऱ्या चेतन संजय छजलाने या तरूणाला सकाळी संशयित आरोपी अजय गरूड आणि इतर जणांनी जुन्या वादातून मारहाण केली. चेतनने आतेभाऊ नेहल संजय शिंदे (वय-१९) रा. समता नगर याला मारहाणीबद्दल माहिती दिली. आपण जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे सांगितले. चेतनला भेटण्यासाठी नेहल शिंदे दुपारी १ वाजता जिल्हा रूग्णालयात आला. त्यावेळी नेहलचा मित्र विशाल अनिल घेंगट (वय-२१) रा. समता नगर हा देखील उपस्थित होता. चेतनची विचारपूस केल्यानंतर नेहल आणि विशाल हे दोघे दुचाकीने चेतनच्या घरी कार्यक्रमासाठी निघाले. शहरातील डिएसपी चौकात अजय गरूड, सोनू आढाळे हे दुचाकीवर येवून दुचाकीसमोर आडवे झाले. दोघांना पाहून नेहल आणि विशाल यांनी घाबरून कोल्हे हिल्सकडे दुचाकीने पळ काढला. अजय गरूड आणि इतरांनी दोघांचा पाठलाग केला. पुढे दोघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अजय गरूड हा फरार होता. वर्षभरानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी अजय लक्ष्मण गरूड (वय-24) रा.गेंदालाल मील याला आज अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, पो.ना. नितीन बाविस्कर, पो.ना. प्रीतम पाटील, पो.ना. राहुल पाटील, चालक स.फौ. रमेश जाधव यांनी त्याला राहत्या घरातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.