जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचननगरात राहणाऱ्या महिलेची दुचाकीसह डिक्कीत ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड शनिवारी मध्यरात्री लांबविणाऱ्या चौघांना शनीपेठ पोलीसांनी सोयगाव जि. औरंगाबाद येथून अटक केली आहे. चौघांवर शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी प्रविण शिरसाठ (वय-३४) रा. हातेड ता. चोपडा ह.मु. वाणी मंगल कार्यालय कांचन नगर यांच्याकडे स्कुटी (क्रमांक एमएच १९ डीबी २८७०) आहे. शुक्रवारी २० फेब्रुवारी सायंकाळी त्यांनी दुचाकी वाणी मंगल कार्यालयासमोर पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी शनीवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी लांबविली. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड देखील चोरून नेली. शनिवारी सकाळी दुचाकी जागेवर नसल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला परंतू मिळून आली नाही. शनीपेठ पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पथकाने शोध घेत निंबायती तांडा ता. सोयगाव जि. औरंगाबाद येथून संशयित आरोपी दिपक राजेंद्र पाटील रा. वाल्मिक नगर, रूपेश ईश्वर पाटील रा. मेक्सोमाता नगर, संदीप संजय पवार (वय-२३) आणि निलेश सुरेश इंगळे (वय-२४) दोन्ही रा. निंबायती ता. सोयगाव जि. औरंगाबाद चौघांना अटक केली आहे. यातील संशयित आरोपी दिपक पाटील आणि रूपेश पाटील यांनी जळगावातून दुचाकी चोरून नेवूवन निंबायती तांडा येथे विक्री केली. चोरीची दुचाकी घेणाऱ्या संदीप पवार आणि निलेश इंगळे यांनाही सहआरोपी केले आहे. चौघांकडून दुचाकी हस्तगत केली आहे. चौघांविरूध्द शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. दिनेशसिंग पाटील, सपोनि अमोल कवळे, रविंद्र पाटील, अनिल कांबळे, राहूल घेटे, मुकुंद गंगावणे, इंदल जाधव, रविंद्र बोदडे यांनी कारवाई केली. पुढील तपास पोहेकॉ परिश जाधव करीत आहे.