जळगाव प्रतिनिधी । गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात १४६ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरातील रूग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील रूग्णांची संख्या हळूहळू वाढीस लागली आहे. प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली असून आज या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधाचे संकेत दिले आहेत. या अनुषंगाने गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल १४६ नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर चोवीस तासांमध्येच जिल्ह्यातील ४६ रूग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहरातील सर्वाधीक ७८ रूग्ण आहेत. शहरात गेल्या पाच दिवसांपासून रूग्ण संख्या वाढीस लागल्याचे यातून दिसून आले आहे. उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, चोपडा तालुक्यात २० व अमळनेरात १८ रूग्ण आढळून आले आहेत. उरलेले रूग्ण हे विविध तालुक्यांमधील आहेत.जिल्ह्यात गत २४ तासांमध्ये कोरोनामुळे एक रूग्णाचा मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी दर हा ९६.१४ टक्के तर मृत्यू तर २.३५ टक्के इतका असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या अहवालातून दिसून आली आहे. नागरिकांनी दुसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.