जळगाव प्रतिनिधी । आपल्या शेजारी राहणार्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमाला न्यायाधिशांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नगरदेवळा येथील रहिवासी किशोर ऊर्फ पिंटू निंबा भोई (३८) याने २६ मार्च २०१९ रोजी घराशेजारी राहणार्या साडेतीन वर्षांच्या बालिकेस चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केला. बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून किशोरविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र सादर केले होते.
२९ नोव्हेंबर २०१९ रोजी या खटल्यास सुरुवात झाली. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. त्यात पीडित बालिकेची साक्ष महत्त्वाची ठरली. यानंतर बुधवारी न्यायालयाने किशोर याला दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. खटला सुरू असतांना किशोर भोई हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. आता शिक्षा ठोठावल्यानंतर त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.