जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून येत असून आज दिवसभरात ७४ नवीन रूग्णांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढीस लागले आहेत. दरम्यान, आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात ७४ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ३५ पेशंट हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल भुसावळात नऊ तर चाळीसगाव तालुक्यात आठ रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे दिसून आले आहेत. तर मुक्ताईनगर आणि बोदवड वगळता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना बाधीत असल्याचे आजच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहेत.
दरम्यान, गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात ४० रूग्णांनी कोरोनावर मात केली असून एक रूग्णाचा या विषाणूच्या बाधेमुळे मृत्यू झालेला आहे. यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.