एरंडोल रतीलाल पाटील । मूळचे एरंडोल तालुक्यातील रहिवासी, तरूणाईचे आयकॉन तथा सध्या ओडिशा राज्यातील आयएएस कॅडरचे अधिकारी राजेश पाटील यांची प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात बदली करण्यात आली असून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार आहेत.
राजेश प्रभाकर पाटील (IAS Rajesh Patil ) यांची जीवनकथा ही लक्षावधी तरूणांसाठी प्रेरणादायी बनली आहे. त्यांचे पालक हे शेतमजूर होते. तर शिकत असतांना राजेश पाटलांना पाव व भाजी विक्रीचे काम करावे लागले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यानंतर त्यांनी जिद्दीने पुढील शिक्षण पूर्ण केले. २००५ सालच्या युपीएससी परिक्षेत त्यांनी यश संपादन करून भारतीय प्रशासनीक सेवा अर्थात आयएएसमध्ये प्रवेश केला. आपल्या अतिशय संघर्षशील अनुभवांवर त्यांनी लिहलेले ताई मी कलेक्टर व्हयनू हे पुस्तक तुफान गाजले असून त्यांच्या व्याख्यानांनी तरूणाईला दिशा देण्याचे काम केले आहे. ते तरूणाईनचे आयकॉन म्हणून ओळखले जातात.
राजेश पाटील यांनी ओडिशा राज्याचे कॅडर निवडले असल्यामुळे ते आजवर त्याच राज्यात विविध पदांवर कार्यरत होते. अलीकडच्या काळात ते महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर येणार असल्याची चर्चा सुरू होती. या अनुषंगाने आज झालेल्या आयएएस अधिकार्यांच्या बदलीत त्यांची महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळणार आहेत.
राजेश पाटील यांनी ओडिशात विविध पदांवर काम करतांना आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली आहे. विशेष करून मयूरभंज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची वाखाणणी करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमिवर आता ते पिंपरी-चिंचवड सारख्या अतिशय महत्वाच्या महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.