जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या तरूणाचे लग्नाविषयी बोलणे सुरू असतांना पाच जणांनी मुलाविषयी गैर समज पसरविल्याचा जाब विचारल्याप्रकरणी शिवीगाळसह मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, विकास बळीराम ढोले (वय-५४) रा. रेणूका नगर, मेहरूण परिसर जळगाव हे कुटुंबियांसह राहतात. त्यांचा मुलगा अजय ढोले यांचे लग्नाची सोयरीक संबंधाबाबत बोलणे सुरू आहे. दरम्यान, त्याच परिसरात राहणारे त्यांचे नातेवाईक शांताराम बळीराम ढोले, संजय शांताराम ढोले, नंदू शांताराम ढोले, विश्वास शांताराम ढोले आणि उज्वला शांताराम ढोले यांनी विकास ढोले यांच्या मुलाविषयी गैरसमज पसरवला. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता पाचही जणांनी विकास ढोले यांच्यासह त्यांचा मुलगा अजय ढोले, सचिन ढोले व त्यांची पत्नी प्रमिला ढोले यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी विकास ढोले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.