नवी दिल्ली वृत्तसंस्था । प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांतर्फे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात गोळ्या झाडून चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट उधळण्यात आला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेता प्रजासत्ताक दिनी दिल्ली ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचं समोर आलं आहे. रात्री आंदोलक शेतकऱ्यांनी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर उभं केलं. त्यानंतर या व्यक्तीनं चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट होता, अशी कबूली पकडण्यात आलेल्या आरोपीनं दिली आहे.
व्यक्तीने सांगितलं की, “आमचा प्लान होता की, जसं शेतकरी ट्रॅक्टर परेड घेऊन दिल्लीत येण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा दिल्ली पोलीस त्यांना रोखण्याचा विचार करेन. त्यानंतर आम्ही मागच्या बाजूने फायरिंग करु, म्हणजे पोलिसांना वाटेल की, गोळी शेतकऱ्यांच्याच बाजून चालवण्यात आली आहे.” ही व्यक्ती पुढे बोलताना म्हणाली की, “रॅली दरम्यान, काही लोक पोलिसांच्या वर्दीमध्ये असतील, ते शेतकऱ्यांची गर्दी पसरवण्याचं काम करतील.”