मुंबई: वृत्तसंस्था । कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या मनावर स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचा संदेश बिंबवण्यासाठी तयार करण्यात आलेली कॉलर ट्यून आता बहुतांश लोकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची बाब समोर आली आहे.
या कॉलर ट्यूनमुळे दररोज तीन कोटी तास वाया जात असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सर्व मोबाइल नेटवर्कवरून ही कॉलर ट्यून ऐकवली जाते. आपत्कालीन परिस्थितीत ही ‘कॉलर टय़ून’ त्रासदायक ठरते, कारण वापरकर्त्यांला फोन त्वरित स्वीकारला जाणे अपेक्षित असताना नाहक ‘कॉलर टय़ून’ ऐकावी लागते. त्यामुळे लोकांना दैनंदिन कामकाजात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भारतामध्ये दररोज सरासरी ३०० कोटी कॉल केले जातात. या कॉलर ट्यूनमुळे लोकांच्या वाया जात असलेल्या वेळेची एकत्रित गोळाबेरीज केल्यास ३ कोटी तास इतकी होते.
मोबाईलवरील अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना प्रतिबंधाची माहिती देणारी कॉलर ट्यून बंद करण्यात येणार आहे. या कॉलर ट्यूनऐवजी आता कोरोना लसीकरणाची धून ऐकू येणार आहे. देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने, याविषयी जनजागृती ट्यून बदलण्यात येणार आहे.
ए. के. दुबे आणि पवन कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या कॉलर ट्यून संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. ‘या कॉलर ट्यूनमुळे सगळेच ग्राहक त्रस्त असून, ही ट्यून लवकरात लवकर बंद करण्यात यावी, , असे या याचिकेत म्हटले होते.
‘ट्राय’चे अध्यक्ष पी. डी. वाघेला यांनीही कॉलर ट्यूनबाबत नापसंती दर्शविली आहे. करोना साथीशी संबंधित संदेशांची अनेकदा पुनरावृत्ती होते. परिणामी कालबाह्य़ कॉलर टय़ून हे त्रासाचे साधन बनले आहे. मोबाइल वापरकर्ते अशा संदेशांकडे मोठय़ा प्रमाणात दुर्लक्षही करतात. आता लोक सामाजिक अंतर नियम आणि मुखपट्टय़ांच्या वापरण्याबाबत पुरेशी जागरुकता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘कोरोना’च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता त्रस्त झाले आहेत, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी केली होती. ‘कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही’, असे नांदगावकर यांनी म्हटले होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोना काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेली कॉलर ट्यून बंद करावी, अशी मागणी केली होती.