वाशिंग्टन : वृत्तसंस्था । अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराची जगभरातील बहुतेक देशांनी निंदा केली आहे. इराण, रशिया आणि चीनने अमेरिकेतील या हिंसाचारावरुन अमेरिकेला फटकारलं असून अमेरिकन सरकारांना यावरुन धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.
चीनी माध्यमांनी तर एक पाऊल पुढे टाकत याला ‘एक सुंदर दृश्य’ अशा शब्दांत अमेरिकेची खिल्ली उडवली. तर रशियाने याला कमजोर होत असलेली लोकशाही अस संबोधलं आहे.
चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने अमेरिकेत झालेल्या हिंसाचारावर एक टीकात्मक लेख प्रकाशित केला आहे. यात चीनी लोकांच्या सोशल मीडिया पोस्टचा हवाला देताना लिहिलं की, अमेरिकेत जे काही झालं ते त्यांच्याच कर्माचं फळ आहे. त्यांचा लोकशाहीचा फुगा फुटला आहे. जेव्हा हाँगकाँगमध्ये आंदोलन झालं होतं तेव्हा अमेरिकेने आंदोलकांच्या साहसाची प्रशंसा केली होती आणि याला सुंदर दृश्य असं संबोधलं होतं.
इराणची सरकारी वृत्त एजन्सी इस्लामिक रिपब्लिकनुसार, इराणचे राष्ट्रपती हसन रुहाणी यांनी अमेरिकन संसदेत झालेल्या हिंसाचारावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. अमेरिकेत जे काही झालं त्यावरुन हे दिसून येतं की एक लोकप्रिय नेता आपल्या देशाच्या सन्मानाला कसं नुकसानं पोहोचवू शकतं. एक चुकीचा माणूस येतो सत्ता आपल्या हातात घेतो आणि संपूर्ण जगासोबत अमेरिकेचे संबंध खराब करतो आणि त्याचबरोबर स्वतःचा पराभवही करुन घेतो, अशा शब्दांत त्यांनी ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली.
रशियाच्या फॉरेन अफेअर्स कमिटीचे प्रमुख आणि अप्पर हाऊसचे खासदार कॉन्सटनटीन खुश्चेव यांनी म्हटलं की, हे स्पष्ट आहे की अमेरिकेची लोकशाही अडखळत आहे आणि हे होणारच होतं. आता लवकरच ती खाली कोसळणारच आहे, असं मी कोणत्याही शंकेशिवाय सांगू शकतो. अमेरिका जगाची दिशा ठरवण्याची गोष्ट करत होता मात्र हा देश स्वतः कुठल्या दिशेला निघाला आहे त्यालाच माहिती नाही.