न्यूयॉर्क : वृत्तसंस्था| अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी स्लथांतरबंदीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक “ग्रीन कार्ड” अर्जदार आणि तात्पुरते अमेरिकेत येणाऱ्या परदेशी कामगारांना देशात प्रवेश करण्यात अडथळा होणार आहे.
कोरोना संकटात स्वदेशी लोकांचे उर्वरित रोजगार वाचवण्यासाठी स्थलांतरबंदी लागू करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. एप्रिल आणि जून महिन्यात स्थलांतरबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. ३१ डिसेंबरला ही बंदी संपुष्टात येणार होती. पण आता ही बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रम्प सरकारच्या परदेशी कामगारांवर बंदीच्या निर्णयाचा अनेक उद्योजकांनी जाहीरपणे विरोध केला होता.
लवकरच राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणारे जो बायडन यांनी या बंदीच्या निर्णयाचा विरोध केला होता. पण सत्तेत आल्यानंतर निर्णय बदलण्याबद्दल त्यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही.कोरोनाचा फटका बसला असताना अमेरिकेत सध्या दोन कोटी लोकांना बेरोजगारी भत्ता मिळत आहे.
अमेरिकेत दरवर्षी मोठया प्रमाणावर परदेशी नागरिक नोकरीसाठी येतात. त्यांना एच १ बी आणि अन्य वर्क व्हिसा दिले जातात. तेच व्हिसा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. सतत नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेण्याची अमेरिकेची कल्पकता आणि स्पर्धात्मक वातावरण याला दुहेरी फटका बसेल असा इशारा या आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांनी दिला होता. पण आता याचा कार्यकाळ अजून तीन महिने वाढवण्यात आला आहे.