जळगाव प्रतिनिधी । मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी भिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, जळगाव महानगरपालिका क्षेत्रात 5 जानेवारी 2021 पर्यंत पूर्णत: संचारबंदी लागू केली आहे. तसेच जळगाव महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त घराबाहेर न पडता घरीच साधेपणाने साजरे करावे. जिल्ह्यातील रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येवून गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग राहील याची काळजी घ्यावी. तसेच मास्क व सॅनेटायझरचा वापर करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील 60 वर्षांवरील आणि दहा वर्षांखालील मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. तसेच मिरवणुका काढण्यात येवू नये. नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिकस्थळी जाताना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळावे. संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून खबरदारीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतषबाजी करू नये. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोविड – 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.