पटना, वृत्तसंस्था । बिहारमध्ये मागील महिन्यात निवडणुक होऊन नितीश कुमार यांचे सरकार आलेले असतांना राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढच्या वर्षी निवडणुका होऊ शकतात, त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बोलताना त्यांनी, माझी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी मला पूर्ण अधिकार दिले आहेत. तुम्हीही हे विसरून चालणार नाही आणि सक्रिय राहा. सगळ्यांनी पूर्ण तयारीनिशी राहावं, पुढील वर्षी पुन्हा निवडणूक होऊ शकते. सध्याच्या सरकारवर लोक नाराज आहेत, असे सांगितले. याबैठकीत तेजस्वी यादव यांनी पक्षात मोठे फेरबदल करण्याचेही संकेत दिले. पक्ष सर्वच समूहातील लोकांना संधी देईल. जुन्या परंपरेत आता बदल करण्याची गरज आहे. आढावा घेऊन हे बदल केले जातील. आपले अनेक उमेदवार पक्षातूनच झालेल्या बंडामुळे पराभूत झाले आहेत. असं करून कुणालाही फायदा होत नाही. ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना पक्ष दुसरीकडे संधी देईल, पण पक्षात राहूल पक्षविरोधी काम करणं चांगलं नाही, असं तेजस्वी यादव म्हणाले.