जळगाव प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह त्याच्या पंटरवर वृध्देची फसवणूक केल्या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, मालती अविनाश साबळे (वय ६२, रा. आळंदी, ता. खेड, पुणे) यांनी तक्रार दिल्यामुळे जितेंद्र कंडारे व त्याच्या हस्तकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेचे पती अविनाश साबळे यांचा सन २००७मध्ये मृत्यू झाला होता. साबळे दांपत्यास तीन मुली व एक मुलगा असे अपत्य आहेत. साबळे यांच्या निधनानंतर मालती यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. त्यांनी मुलांचे शिक्षण व लग्नासाठी कोळाणी (ता. खेड) येथील शेती विकली होती. एका वृत्तपत्रातील बीएचआरची जाहिरात पाहून त्या आळंदी येथील बीएचआरच्या शाखेत गेल्या. ठेवीवर १३ टक्के व्याज देणारी ही जाहिरात होती. यानुसार मालती यांनी १२ लाख रुपये बीएचआरच्या आळंदी शाखेत ठेवले. मुदत संपल्यानंतर त्यांना १३ लाख ६५ हजार रुपये परत करण्याचे आश्वासन बीएचआरने केले होते. दरम्यान, काही वर्षातच बीएचआरच्या संचालकांनी अपहार केला असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल होत असल्याची माहिती मालती यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आळंदीच्या शाखेत जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही शाखा बंद पडली होती. तसेच बीएचआरवर जितेंद्र कंडारेची शासनाच्या वतीने अवसायक म्हणून नेमणूक झाल्याचेही मालती यांना कळाले.
दरम्यान, २०१६ मध्ये मालती साबळे यांच्या घरी दोघांनी भेट घेऊन सांगितले की, की, बीएचआर संस्था आता बुडाली आहे. अवसायक कंडारे हा आमचाच माणूस आहे. तेव्हा तुम्ही २० टक्के रक्कम घेऊन पावती आम्हाला विकून टाका. असे त्या दोघांनी मालती यांना सांगितले. मात्र त्यांनी याला नकार दिला. यानंतर सन २०१९मध्ये ते दोघे लोक परत मालती यांच्याकडे गेले. यावेळी त्यांनी २० ऐवजी ३५ टक्के रक्कम परत देण्याचे सांगितले. यावेळीदेखील मालती यांनी प्रस्ताव फेटाळला. यानंतर सन २०२०मध्ये पुन्हा हे दोघे मालती यांच्या घरी गेले. यावेळी त्यांनी थेट मालती यांना धमकी दिली. या धमकीनंतर त्या घाबरल्या. मालती यांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी आळंदी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार अवसायक कंडारे, संबंधित बीएचआरचे पदाधिकारी व दलाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.