उर्मिला मातोंडकरांमुळे शिवसेनेचा प्रभाव वाढणार

 

मुंबई : वृत्तसंस्था । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने शिवसेनेला आपली ताकद वाढवण्यासाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठा चेहरा मिळालाय.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर तर आहेच, शिवाय लोकसभा निवडणूक आणि सध्याचे भाजपसोबतचे संबंध यावर नजर टाकली तर उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने शिवसेनेला मोठी मदत मिळणं साहजिकच आहे. कारण, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात लोकसभा निवडणुकीतच काँग्रेसच्या उमेदवार म्हणून दाखवला होता.

उर्मिला मातोंडकर यांनी हाती बांधलेलं शिवबंधन शिवसेनेची ताकद वाढवणारं आहे. काँग्रेसच्या उमेदवार असताना उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन झंझावाती प्रचार केला आणि मराठी मतदारांना आकर्षित केलं. मोदी लाट असतानाही त्यांना २ लाख ४० हजारांपेक्षा जास्त मतं घेतली. भाजपचे गोपाल शेट्टी या मतदारसंघातून लाखोंच्या फरकाने जिंकून येतात. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ४ लाखांच्या फरकाने विजय मिळवला. गोपाल शेट्टी यांचा हा विजय मोठा असला तरी काँग्रेसला उर्मिला मातोंडकर यांच्यामुळे मिळालेली मतेही अत्यंत महत्त्वाची ठरतात.

अभिनेत्री असल्यामुळे अर्थातच त्या उमेदवार असण्यासोबत एक स्टार प्रचारकही होत्या. उत्तर मुंबईतील मतदारसंघात जाऊन त्यांनी स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधलं आणि भाजपच्या विद्यमान खासदाराला प्रश्नाचं उत्तर द्यायला भाग पाडलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीने त्यांना एक राजकारणी म्हणून प्रस्थापित होण्यासाठी मदत केली. पण काँग्रेसमधील भेदभावामुळे त्यांनी नंतर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरीवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी चार आमदार भाजपचे, तर प्रत्येकी एक-एक आमदार शिवसेना आणि काँग्रेसचा आहे. त्यामुळे या भागातून महापालिका निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने शिवसेनेला जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणं सोयीचं आहे. लोकसभा निवडणुकीतील त्यांचा जनसंपर्क आणि एक सेलिब्रिटी असणं या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मोदी लाटेत उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला. पण त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या हे विसरुन चालणार नाही. भाजपच्या गोपाल शेट्टींनी ७ लाखांपेक्षाही जास्त मते मिळवली असली तरी यात शिवसेनेच्या मतदारांचाही मोठा वाटा होता. युतीमध्ये निवडणूक लढवल्यामुळे गोपाल शेट्टी यांच्यासमोर काँग्रेसच्या उमेदवाराचा निभाव लागला नाही. पण काँग्रेसच्या उमेदवार म्हणून उर्मिला मातोंडकर यांनी जवळपास अडीच लाख मते मिळवली. त्यात शिवसेनेच्या मराठी मतदारांचीही भर पडल्यास भाजपच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडणं शिवसेनेला अत्यंत सोपं जाईल.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघावर नेहमीच भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे. भाजपचे राम नाईक या मतदारसंघातून पाच वेळा खासदार होते. पण यानंतर काँग्रेसने अभिनेता गोविंदाला उमेदवारी दिली आणि राम नाईक यांचा विजयरथ थांबवला गेला. यानंतर पुन्हा २००९ ला काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी विजय मिळवला. २०१४ ला भाजपच्या गोपाल शेट्टी यांनी लाखोंच्या फरकाने जिंकून येत पुन्हा आपला बालेकिल्ला खेचून आणला. २०१९ लाही गोपाल शेट्टी यांनीच विजय मिळवला.

Protected Content