राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकले मनसेचे मोर्चे

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना काळातील वीजबिलांच्या माफीबाबत प्रमुख विरोधी पक्ष भाजपानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरामध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबादमध्ये मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोडफोड करु नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी हातामध्ये तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी असे फलक हाती घेऊन राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले.

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेने आज सकाळी दहाच्या सुमारास मोर्चा काढला. यावेळी मनसेचे नेते आणि शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यामध्ये आज मनसेकडून शनिवार वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केलं. शनिवार वाडा परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त टेवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मनसे शहर अध्यक्ष अजय शिंदेसहीत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलीस मनसे कार्यकर्त्यांना फरासखाना पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा फरासखाना पोलीस स्थानकाकडे वळवला.

आम्ही शनिवार वाडा येथून जिल्हाधिकारी कार्यालयकडे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार होतो. पण तुम्ही मोर्चा काढू दिला नाही. आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आला आहात, आता जोवर या ठिकाणी जिल्हाधिकारी इथे येऊन आमच निवेदन स्वीकारणार नाही. तोवर आमच ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली. साडेबाराच्या सुमारास वीजबिलांसंदर्भातील निवेदन पोलिसांकडे देत पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

ठाण्यातही मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. मात्र ठाणे पोलिसांनी जमावबंदीचा आदेश कायम ठेवला. या आदेशानुसार पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा पाठविल्या असून त्यात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही अविनाश जाधव यांच्या नौपाड्यातील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील हजारो मनसे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पोलिसांनी शहरात अद्यापपर्यंत जमावबंदीचा आदेश कायम ठेवला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमता येत नाही.

नवी मुंबईमध्ये बेलापूर, ऐरोलीमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभाग नोंदवला. बेलापूरमध्ये कोकण भवनापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

नाशिकमध्येही राजगड कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा मनसेने काढला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

औरंगाबादमध्येही मनसेच्या वीजबीलवाढीविरोधातील मोर्चाला शेकडोच्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानंतर मोर्चा पांगला. मात्र नंतर पुन्हा मोर्चा सुरु झाला. त्यानंतरही पोलिसांनी धरपकड सुरु केली. मात्र मनसेचे कार्यकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे दिसून आलं.

 

Protected Content