जळगाव प्रतिनिधी । अवैध वाहतुकीची सर्रासपणे वाहतुक होत असल्याने, तसेच याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सोमवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास खेडी, आव्हाणे, निमखेडी या शिवारांमध्ये गिरणानदीपात्रात जावून पाहणी केली.
या पाहणीत अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनांचे चोरटे मार्ग, कोणकोणत्या ठिकाणांहून वाळूचा उपसा कसा व कोणत्या पध्दतीने केला जातो याबाबतही जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांकडून माहिती जाणून घेण्यात आले. दरम्यान अचानकच्या या पाहणीने एकच खळबळ उडाली असून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
जिल्हाभरातील वाळू गटांचा लिलाव झालेला नाही. असे असतांनाही मोठ्या प्रमाणावर तसेच सर्रासपणे अवैधपणे वाळु वाहतूक करण्यात येत आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात येवून तपासणी करण्यात आली. यात रात्रीच्या वेळी वाळूची वाहनांवर कारवाई करण्यात येवून संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध वाळू वाहतुकीवर कायमचा आळा बसावा, व महसूलात वाढ व्हावी, असे आदेशही नुकतेच विभागीय आयुक्तांकडून जिल्हाप्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अवैध वाळू वाहुकीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे काही तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या.
या दोन्ही गोष्टींना अनुसरुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडून सोमवारी सायंकाळी अचानकपणे गिरणा नदी परिसरातील खेडी, आव्हाणे तसेच निमखेडी या शिवारांमध्ये पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकारी थेट नदीपात्रात उतरुन नेमकी कुठून व कशा पध्दतीने वाळू उपसा होतो. कोणत्या मार्गाने वाहने नदीपात्रात उतरतात व वाळू भरल्यानंतर कोणत्या चोरट्या मार्गांनी वाहतूक करतात याबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसोबत प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार नामदेव पाटील, तलाठी यांचीही उपस्थिती होती. जिल्हाधिकार्यांना नदीपात्रात काही डंपरही दिसून आले. मात्र त्यात वाळू नव्हती. याबाबत संबंधित पोलीस ठाण्याला कारवाईच्या सुचना करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी बोलतांना सांगितले. तसेच लवकरच मोठी कारवाई होणार असल्याचे संकेतही त्यांनी बोलतांना दिले आहे.