जळगाव, प्रतिनिधी । महानगरपालिका फंडातील बिले अदा करताना पारदर्शी पद्धतीचा अवलंब करण्याकरिता स्थायी समितीत धोरण निश्चित करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका फंडातील काम करणाऱ्या ठराविक ठेकेदारांची बिले अदा करण्यात येतात व इतर ठेकेदारांना महापालिकेच्या आर्थिक स्थिती योग्य नसल्याची सबब सांगून बिले अदा केली जात नाही. जे ठेकेदार महापालिकेतील काही अधिकाऱ्यांसोबत देवाण-घेवाण करतात त्यांची बिले प्रधन्याने काढण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी केला आहे. तसेच जे मक्तेदार असा आर्थिक व्यवहार करत नाही त्यांना वर्षानुवर्षे बिलांसाठी फिरविले जात असल्याने मनपातील कामांच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परीणाम होत असल्याचे मत श्री. मराठे यांनी व्यक्त केले आहे. याकरिता बिले अदा करण्याबाबत एक पारदर्शी नियमावली तयार करून मक्तेदाराला त्याचे पैसे मिळण्यास उशीर जरी झाला तरी केलेल्या कामांच्या क्रमवारीने पारदर्शीपणे पैसे अदा झाले तर नवीन ठेकेदार येऊन स्पर्धा तयार होऊन गुणवत्तापूर्वक व मनपाच्या पैशांची बचत होण्यास मदत होईल असा आशावाद श्री. मराठे यांनी व्यक्त करत महानगरपालिका फंडातील बिले अदा करताना पारदर्शी पद्धतीचा अवलंब करण्याकरिता स्थायी समितीत धोरण निश्चित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.