मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जाहिरातींसाठी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं याबाबतच जीआरही काढला आहे. हा निधी वितरितही करण्यात आला असून जनतेच्या इतक्या मोठ्या पैशांचा जाहिरातींवर खर्च होणार आहे. शासनामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती, उपक्रम, विकासकामं, शासकीय संदेश यांना व्यापक प्रसिद्धी देऊन त्यांचा प्रसार करण्यासाठी वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडियो, होर्डिंग्ज-एलईडी-बस-ट्रेन-वॉल पेंटिंग, सोशल मीडिया, डिजिटल मीडियांमार्फत ‘विशेष प्रसिद्धी मोहिम’ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या काळात राबवण्यात येणार आहे.
यामध्ये प्रिंट मीडियासाठी २० कोटी, इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी २० कोटी ८० लाख, सोशल मीडियासाठी ५ कोटी, होर्डिंग्ज-एलईडी-बस-ट्रेन-वॉल पेंटिंग आदींसाठी ३७ कोटी ५५ लाख तर सरकारी संदेशांसाठी ७५ लाख ५० हजार रुपये अशा रक्कमा वितरीत करण्यात आल्या आहेत. शासन निर्णयानुसार, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत विशेष प्रसिद्धी मोहिम राबवण्यासाठी माध्यम आराखडा तयार करण्यासाठी ८४ कोटी १० लाख ५० हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. ४ मार्च २०२४ रोजी सरकारनं या खर्चाला मान्यता दिली आहे.