जळगाव प्रतिनिधी । मुंबईतल्या दादर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हल्ला केलेल्या समाजकंटकांना तत्काळ अटक करावी अशी मागणी विश्व इंडियन पार्टीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या “राजगृह” आवारात अज्ञात समाजकंटकांनी ७ जुलै रोजी तोडफोड केली. राज्यालाच नव्हे तर देशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा विश्व इंडियन पार्टी महिला आघाडीतर्फे जाहिर निषेध करण्यात आला. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी बांधले होते. जगभरातील अनुयायी येथे दररोज भेट देतात. जगभरातील अनुयायांसाठी ते अस्मितेचे स्थान आहे.
राजगृहावर हल्ला होणे, म्हणजे देशाचा अस्मितेवर, संविधानावर झालेला भ्याड हल्ला आहे. तो कदापी ही सहन केला जाणार नाही. या घटनेमागे निश्चितपणे कोणीतरी असू शकतात. अश्या मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा. या मास्टर माईंड सह राजगृहावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून जेरबंद करण्यात यावे. तसेच संबंधित दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.