जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील तोरनाळा येथे एका शेतकऱ्याच्या राहत्या घराच्या पोर्चमध्ये ठेवलेले तुरीचे १२ कट्टे अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णू धुमसिंग पाटील (वय ४८) रा. तोरनाळा ता. जामनेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तवयाला आहे. त्यांनी आपल्या शेतातील तुरीचे पीक काढून ते १२ कट्ट्यांमध्ये भरून घराच्या पोर्चमध्ये ठेवले होते. २ फेब्रुवारीच्या रात्री ९:३० ते ३ फेब्रुवारीच्या सकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी ५८ हजार ८०० रुपये किमतीची ही ८ क्विंटल ४० किलो तूर लंपास केली. फत्तेपूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सपोनि प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




