जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रूग्णाचे व उपचार करणाऱ्या डॉक्टर तथा नर्सिंग कर्मचारी या सर्वांचे मनोबल वाढावे व जिल्ह्यातील या रूग्णांचा मृत्यूदर नियंत्रणात यावा या दृष्टीने जळगाव फर्स्टच्या मंचावरून आवाहन करून एकत्रितपणे १५० पल्स ऑक्सिमीटर संकलित करण्यात येणार आहेत. त्यापैकी आज ७५ यंत्रे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले.
पल्स ऑक्सिमीटरचे भंवरलालजी & कांताई फाउंडेशन,गांधी रिसर्च फाऊंडेशन,कांताई नेत्रालय व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी १०० यंत्रे उपलब्ध करून दिली. तर उर्वरीत ५० यंत्रांसाठी डॉ. राधेश्याम चौधरी, अनिल कांकरीया, नितीन लढ्ढा,अॅड सलीम पटेल, रमेश मुणोत, साजीद शेख या मान्यवरांनी योगदान देवून जळगावच्या शासकिय कोविड रूग्णालयाला उपलब्ध करून दिले आहेत. आज ७५ फिंगरटीप पल्स ऑक्सिमीटर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ राधेश्याम चौधरी,नितीनजी लढ्ढा्, जैन उद्योग समुहातर्फे अमर जैन,अनिल जोशी, अनिल कांकरीया, सलीम पटेल, ट्रेंड इंजिनियरींगचे साजीद शेख,विक्रम मुणोत आदी उपस्थित होते.