जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील यशवंत कॉलनीतील सिद्धेश अपार्टमेंटमध्ये डॉ. समीर रमाकांत सोनार यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आणि घड्याळ असा ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, डॉ. सोनार (वय ३५) हे वैद्यकीय व्यवसायिक असून, त्यांचे घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हा गुन्हा केला. सोमवारी १३ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी डॉ. सोनार यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. रात्री साडेनऊ वाजता अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना चव्हाण करत आहेत.