मुंबई, वृत्तसेवा । आज शनिवार ( दि. ७ ) रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सचिन म्हणून ओळखला जाणारा फलंदाज वसीम जाफरनं निवृत्ती जाहीर केली. वसीम जाफर आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना एप्रिल २००८ मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
निवृत्ती जाहीर केल्यानंतर वसीम जाफरने आपल्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद दिले. “देशाचं प्रतिनिधीत्व करून मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे आणि यासाठी मला अभिमान वाटतो,” असं तो म्हणाला. “सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग आणि धोनी यांसारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं माझ्यासाठी फार मोठी बाब आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, झाहीर खान, अमोल मुजुमदार आणि निलेश कुलकर्णी यांच्यासारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं माझ्यासाठी कायमचं खास राहिल,” असंही तो म्हणाला.
१० रणजी किताब
वसीम जाफर १९९६-९७ ते २०१२-१३ दरम्यान ८ रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघात सहभागी होता. तर २०१८ आणि २०१९ मध्ये वसीम जाफरनं विदर्भाला रणजीचा किताब मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानं गेल्या ११ सामन्यांमध्ये ४ शतकं झळकावली होती. तर ६९.१३ च्या सरासरीनं १ हजार ३७ धावा केल्या होत्या.
प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक
जाफरनं प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावत भारतीय कसोटी संघात प्रवेश मिळवला होता. तो फेब्रुवारी २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. कसोटी सामन्यांमध्ये पहिलं शतक ठोकण्यासाठी त्याला सहा वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर कसोटी सामन्यात त्यानं दुहेरी शतकही झळकावलं होतं.
रणजी सामन्यांमध्ये धावांचा विक्रम
प्रथम श्रेणीचे तब्बल २६० सामने खेळत जाफरनं १९ हजार ४१० धावा केल्या आहेत. यामध्ये ५७ शतकं आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे १५० रणजी सामने खेळणारा वसीम जाफर हा पहिला खेळाडू आहे आणि त्याच्या नावे १२ हजारांपेक्षा अधिक धावा करण्याचा भारतातील विक्रम आहे.