पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा- भडगाव मतदारसंघातील पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध गावांना व राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरण, डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण व पूल बांधकाम अशा ४३ कोटी रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी मिळाली असून, त्यात पाचोरा तालुक्यातील २१ गावांसाठी २७ कोटी ४५ लाख व भडगाव तालुक्यातील १३ गावांसाठी १५ कोटी ४५ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. ही कामे त्वरित सुरू करून पूर्णत्वास येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात शनिवारी (ता. ९) आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विकास कामांसंदर्भात माहिती दिली. या वेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, बाजार समिती समिती चेअरमन गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, तालुकाप्रमुख किशोर बारवकर, बंडू चौधरी, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, माजी नगरसेवक बापू हटकर, प्रवीण ब्राह्मणे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले, की डिसेंबरच्या बजेटमधून या ४३ कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली असून, या कामांसंदर्भात त्वरित टेंडर प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
पाचोरा तालुक्यातील २७ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या कामांचे गावनिहाय स्वरूप असे : शिंदाड ते पिंपळगाव, कजगाव ते नागद, गिरड ते पाचोरा, ओझर ते काकणबर्डी, लोणवाडी ते राणीचे बांबरुड, घुसर्डी ते नगरदेवळा, बांबरुड ते अंतुर्ली, सारोळा ते मोंढाळा, वाणेगाव ते राजुरी, भातखंडे ते पाचोरा, मोंढाळे ते आर्वे.
खडकदेवळा ते शेवाळे, पिंपळगाव ते बहुलखेडा, पिंपळगाव ते जरंडी, वाणेगाव ते वाडी, शिंदाड ते पिंप्री, उपलखेडा ते बाळद, लासगाव ते कुरंर्गी, लासगाव ते माहीजी, दहिगाव ते सामनेर, तारखेडा ते निंभोरा या रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण व काँक्रिटीकरण तसेच शेवाळे ते खडकदेवळा दरम्यानच्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे.
भडगाव तालुक्यातील १५ कोटी ४५ लाख रुपये खर्चाची कामे याप्रमाणे : वाडे ते गोंडगाव -कनाशी-भडगाव, खेडगाव ते जुवार्डी, बात्सर ते लोण- कनाशी, आडळसे ते खेडगाव, लोण ते राष्ट्रीय महामार्ग जोडरस्ता, पांढरद ते निंभोरा, गोंडगाव ते बांबरुड, जुवार्डी ते बहाळ वस्ती, सावदे ते कोळगाव, वडधे ते कोठली – भराडी वस्ती, गोंडगाव ते पासर्डी, निंभोरा ते निंभोरा वस्ती या रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण, डांबरीकरण व काँक्रिटीकरण तसेच भडगाव येथे शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला पूल बांधकाम करणे अशा कामांचा समावेश आहे, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. गणेश पाटील यांनी आभार मानले.