पहुर. ता.जामनेर । येथून जवळच असलेल्या वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे खून प्रकरणातील अटकेतील चार आरोपींंची पोलीस कोठडी आज संपल्याने त्यांना आज रोजी जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर या गुन्ह्यात काल पुण्यात पकडून आणलेल्या सुमित किशोर जोशी रा.वाकडी यासही आज रोजी जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यास न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली.
विनोद चांदणे खून प्रकरणातील अटकेतील आरोपी वाकडी चे माजी सरपंच चंद्रशेखर पद्माकर वाणी, सरपंच पती तडवी, शेळगाव चा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र परदेशी, विनोद देशमुख, यांची आज पोलीस कोठडी संपल्याने त्यांना जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. या चारही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.तर या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी प्रदिप परदेशी रा.डांभूर्णी ता.पाचोरा व योगेश सोनार रा.शेळगाव हल्ली मुक्काम नगारखाना जामनेर हे पोलीस कोठडीत आहे.
दरम्यान काल पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पहुर पोलीस ठाण्यात येवून आरोपींची तीन तास सखोल चौकशी केली. यावेळी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पाचोरा विभागाचे डीवायएसपी ईश्वर कातकडे हेही तपासात सहभागी होते. तपासासंदर्भात पोलिस अधीक्षक यांनी पत्रकारांशी समाधानकारक माहिती न देता योग्य दिशेने तपास सुरू आहे अशी मोघम माहिती देत वेळ मारून नेली. यावेळी पत्रकारांनी गुन्ह्याच्या तपासा संदर्भात पोलीस सहकार्य करीत नसल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्या कडे केली असता त्यांनी दररोजची माहिती सांयकाळी पत्रकारांना प्रेसनोट देण्याची सुचना केली.
दरम्यान विनोद चांदणे खून प्रकरणात दररोज वेगळी च दिशा मिळत आहे.या गुन्ह्यात आरोपींची संख्या ७ झाली आहे. आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तपासामुळे वरिष्ठ अधिकारी हे पहुर पोलीस ठाण्यात तळ ठोकून असल्याने पहुर पोलीस ठाण्यास छावणी चे स्वरूप आले आहे.