खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची गुणवत्ता तपासणाऱ्या नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडीटेशन (एनबीए), नवी दिल्ली यांनी शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव येथील दोन विभागांना ३ वर्षांसाठी मानांकन प्रदान केले आहे. संगणक आणि विद्युत अभियांत्रिकी या दोन शाखांना १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२८ या कालावधीसाठी हे मानांकन नुकतेच मिळाले आहे.
यापूर्वी अणुविद्युत आणि स्थापत्य या दोन शाखांना मानांकन मिळाले होते. त्यामुळे आता संस्थेच्या एकूण ४ शाखा एन.बी.ए. मानांकित झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यंत्र अभियांत्रिकी विभागाला देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाद्वारे (MSBTE) दोन वर्षांसाठी “अति-उत्कृष्ट” मानांकन मिळाले आहे. यामुळे संस्थेतील सर्वच शाखांना उत्कृष्टतेचे मानांकन प्राप्त झाले आहे.

मूल्यांकन प्रक्रिया: एनबीएच्या मूल्यांकन समितीने आपल्या भेटीदरम्यान कागदपत्रे, ग्रंथालय, प्रयोगशाळा (संगणक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र), वसतिगृह, जिमखाना अशा सर्व सोई-सुविधांची कसून तपासणी केली. तसेच, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून शैक्षणिक बाबींचा आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी समितीने माजी विद्यार्थी, उद्योजक आणि पालकांसोबत बैठक घेऊन संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
या मानांकनामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता, तसेच शैक्षणिक कर्जामध्ये लाभ असे अनेक महत्त्वाचे फायदे होतील, असे मत प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक प्रा. मनोज अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांच्या नेतृत्वाखालील संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाले, असे प्रसिध्दीप्रमुख प्रा. राजेश मंत्री यांनी कळविले आहे.



