जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या तरूणाला अज्ञात व्यक्तीने बोलण्यात गुंतवून एटीएम आदलाबदली करून खात्यातून ३७ हजार ५०० रूपये काढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार १७ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल मेरचंद पवार (वय-३८) रा. गजानन महाराज मंदीर, सुप्रिम कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विठ्ठल पवार हा कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजळील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेत आला होता. बँकेच्या बाहेर असलेल्या एटीएममधून पैसे काढत असतांना एका अनोळखी व्यक्तीने विठ्ठल पवार याला बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्या एटीएमची आदला बदल केली. त्यानंतर पैसे निघाले नाही म्हणून विठ्ठल पवार बाहेर निघाला. थोड्यावेळानंतर त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ३७ हजारर ५०० रूपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत विठ्ठल पवार यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.