पारोळ्यात गावठी दारू अड्ड्यावर छापा : ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

saized liquor

पारोळा, प्रतिनिधी | शहरासह तालुक्‍यात सुरू असलेले अवैध दारू व गावठी हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांनी सध्या कारवाईचे सत्र अवलंबले आहे. आज (दि.२८) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वंजारी शिवारात पोलिसांनी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकून सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

वंजारी शिवारातील भोकरबारी धरणाजवळ शांताराम बाबू भिल व अनिल शांताराम भिल हे दोघे जण हातभट्टीची गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ए.पी.आय. रवींद्र बागुल, हवलदार सुनील वानखेडे, सुनील साळुंखे व राहुल कोळी यांनी घटनास्थळी छापा मारला. त्याठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे काम हे सुरू होते. पोलिसांनी एक पत्री ड्रम, पाच प्लास्टिक ड्रम ३० हजार रु. किंमतीचे कच्चे रसायन ३२०० रुपयांची तयार दारू इतर साहित्य जप्त केले असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात गावठी हातभट्टी वरती पोलिसांची ही सगळ्यात मोठी कारवाई ठरली आहे. तालुक्यात व शहरातही ठिकठिकाणी व काही सोडा गाड्यांवर सर्रास बोगस दारू विक्री केली जात आहे. त्यावरही पोलिसांनी नियमित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Protected Content