Home Cities जळगाव सप्तरंगी सुरांचा ‘इंद्रधनुष्य’: गणपती नगरात हनुमान जयंतीचा अनोखा जल्लोष!

सप्तरंगी सुरांचा ‘इंद्रधनुष्य’: गणपती नगरात हनुमान जयंतीचा अनोखा जल्लोष!


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हनुमान जयंतीच्या पावन दिनानिमित्ताने जळगावातील गणपती नगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘इंद्रधनुष्य २०२६’ या दुसऱ्या सप्तरंगी एकता महोत्सवाने संपूर्ण परिसर सुरांनी, तालांनी आणि उत्साहाने न्हाऊन निघाला. भक्तीगीते, संगीत आणि नृत्याविष्काराच्या संगमातून साकारलेल्या या सांस्कृतिक सोहळ्याला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात परिसरातील ज्येष्ठ महिला नागरिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. महिला सशक्तीकरणाचा संदेश देत सुरू झालेल्या या सोहळ्याने सुरुवातीपासूनच एक सकारात्मक वातावरण निर्माण केले. उद्घाटनप्रसंगी गणपती नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी कार्यक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला.

या महोत्सवातील मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘गीत नृत्य हास्य रंग’ या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘परिवर्तन’ या संस्थेच्या प्रसिद्ध कलावंत मंजुषा भिडे, वरुण नेवे आणि श्रुती जोशी यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले. त्यांच्या सुरेल गायनाला तबल्यावर राहुल कासार, ढोलकवर दर्शन गुजराथी, बासरीवर राजेश्वरी रत्नपारखी आणि हार्मोनियमवर गणेश देसले यांनी दिलेली साथसंगत कार्यक्रमाला अधिक उठावदार बनवणारी ठरली.

गायनासोबतच नृत्याविष्कारांनीही कार्यक्रमाची रंगत वाढवली. खालसा ग्रुप आणि परफेक्ट डान्स ग्रुप (जळगाव) यांच्या सदस्यांनी सादर केलेल्या नृत्यप्रस्तुतींनी प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच होरीलसिंग राजपूत, विलेखा आणि नितेश जैन यांच्या सादरीकरणालाही उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी गणपती नगर परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण परिसरातील अबालवृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. ‘इंद्रधनुष्य २०२६’मुळे गणपती नगर परिसरात एकतेचे, सांस्कृतिक जिव्हाळ्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

 


Protected Content

Play sound