जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा शिवार परिसरात रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणाबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल करत तात्काळ कारवाईची मागणी मंगळवार, १७ मार्च रोजी निवेदनाव्दारे केली आहे. गुरुकृपा नगर परिसरातील महापालिका हद्दीतील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर सुमारे तीन मीटरपर्यंत बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे नागरिकांच्या ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पिंप्राळा शिवारातील गुरुकृपा नगर परिसरातील गट क्रमांक १६२/२ येथील प्लॉटवर सध्या चार ब्लॉकचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामादरम्यान संबंधित अतिक्रमणधारक एकनाथ श्रावण शेकोकार यांनी मागील सुमारे चार महिन्यांपासून महापालिका हद्दीतील सहा मीटरच्या रस्त्यावर जवळपास तीन मीटरपर्यंत अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून परिसरातील नागरिकांना वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

तसेच, सुरू असलेल्या रो-हाऊस प्रकारातील बांधकामात महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच संबंधित व्यक्तीने यापूर्वी केलेल्या बांधकामांमध्येही नियमभंग झाल्याची शक्यता व्यक्त करत त्या बांधकामांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करून रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवावे आणि नागरिकांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. निवेदन देतांना युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार युवा महानगर उपाध्यक्ष दिगंबर सोनवणे, ईश्वर हटकर, संजय बागुल, रवींद्र पाटील, संतोष तायडे आदी उपस्थित होते.



