जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमेरिका आणि इराण दरम्यान निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता स्थानिक स्तरावर, विशेषतः जळगावच्या हॉटेल व्यवसायावर उमटू लागले आहेत. जागतिक घडामोडींमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाला असून, जळगाव शहर आणि जिल्ह्यात गॅसचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील प्रमुख वितरकांकडे सध्या अत्यंत मर्यादित साठा असून, परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या दोन दिवसांत अनेक हॉटेल्सची शेगडी विझण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात सुमारे २५०० हून अधिक हॉटेल्स पूर्णपणे व्यावसायिक गॅसवर अवलंबून आहेत. पुरवठा खंडित झाल्याने या व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून, अनेकांनी गॅस वाचवण्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही हॉटेल चालकांनी जास्त गॅस लागणारे पदार्थ बनवणे तात्पुरते थांबवले असून थेट मेनू कार्डमध्येच कपात केली आहे. इतकेच नव्हे तर, चहा वारंवार उकळण्याऐवजी एकदाच मोठ्या प्रमाणात तयार करून तो थर्मासमध्ये साठवण्यासारख्या तडजोडी कराव्या लागत आहेत.

या संकटामुळे केवळ हॉटेल मालकांचेच नुकसान होत नसून, त्यावर अवलंबून असलेले हजारो कामगार, भाजीपाला विक्रेते, दूध व्यावसायिक आणि किराणा पुरवठादार यांची मोठी साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. काही व्यावसायिक इतर शहरांतून चढ्या दराने सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. सरकारने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जळगावमधील हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. अन्यथा, येत्या दोन दिवसांत स्थानिक अर्थव्यवस्थेवर आणि ग्राहकांवर याचे गंभीर परिणाम दिसून येतील.



