Home Uncategorized कोविड योद्ध्यांना पुन्हा नोकरी द्या; जनसेवा विचारधार फाउंडेशनची मागणी

कोविड योद्ध्यांना पुन्हा नोकरी द्या; जनसेवा विचारधार फाउंडेशनची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कोविड-१९ महामारीच्या भीषण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता या कोविड योद्ध्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार कंत्राटी स्वरूपात पुन्हा सामावून घेण्यासाठी महासभेत ठराव मंजूर करावा, अशी मागणीचे निवेदन जनसेवा विचारधार फाउंडेशन अध्यक्ष निलेश बोरा यांच्या नेतृत्वाखाली महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांना देण्यात आले. निवेदन देण्यात आले.

कोविड महामारीच्या काळात परिस्थिती अत्यंत गंभीर होती. कोरोना बाधितांच्या जवळ जाण्यासाठी त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांनीही धास्तावलेली परिस्थिती असताना कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांनी धैर्याने पुढे येत सेवा दिली. वॉर्डबॉय, बेड सहाय्यक, डॉक्टर, नर्सेस, अॅम्बुलन्स चालक, आया, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि लॅब असिस्टंट यांसारख्या अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची सेवा केली. या काळात केंद्र आणि राज्य शासनानेही या कोविड योद्ध्यांचा गौरव करून त्यांचे कौतुक केले होते.

मात्र कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोविड काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या या कर्मचाऱ्यांकडे शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची भावना व्यक्त होत आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. ही कमतरता भरून काढताना कोविड काळात काम केलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि सेवाभावाचा सन्मान ठेवत त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पुन्हा कंत्राटी तत्त्वावर रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित महानगरपालिकेच्या महासभेत यासंदर्भात ठराव मांडून मंजूर करण्यात यावा आणि कोविड कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कोविड योद्ध्यांनी संकटकाळात निभावलेली भूमिका लक्षात घेता शासनाने त्यांच्या भविष्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. निवेदनावर प्रतिक्षा सोनवणे, ऐश्वर्या सपकाळे, भाग्यश्री चौधरी, विनोद सपकाळे, राजेश सपकाळे, युवराज सुरवाडे, रमेश वानखेडे आदींची स्वाक्षरी आहे.

 


Protected Content

Play sound