मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या महाविकास आघाडीने राज्यात ३० जागा जिंकून अनपेक्षितपणे मुसंडी मारली. ४५ पारचा नारा दिलेल्या महायुतीला केवळ १७ जागांवरच समाधान मानावे लागले. राज्यात भाजपला मोठा फटका बसला असून, काँग्रेस सर्वाधिक १३ जागा मिळविणारा पक्ष झाला आहे. सांगलीत अपक्ष विशाल पाटील विजयी झाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे २३ खासदार निवडून आले होते. या वेळी भाजपचे संख्याबळ ९ पर्यंत घटले आहे. भाजपला १४ जागांचा फटका बसला. भाजप आणि उद्धव ठाकरे गटाला सारख्याच म्हणजे नऊ जागा मिळाल्या आहेत. फोडाफोडीचे राजकारण, मराठा-ओबीसी वाद, शेतकऱ्यांमधील नाराजीचा भाजपला मोठा फटका बसला आहे. लोकसभेत जास्तीत जास्त खासदार निवडून आणून आगामी विधानसभा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट यामुळे अवघड झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. गेल्या वेळी फक्त एक जागा जिंकलेल्या काँग्रेसने अनपेक्षितरित्या १३ जागांवर मुसंडी मारली. काँग्रेस नेत्यांनाही एवढ्या जागा जिंकण्याची अपेक्षा नव्हती. सांगलीत शिवसेना ठाकरे गटामुळे काँग्रेसला हक्काची जागा गमवावी लागली. विदर्भात भाजप विरोधी असलेल्या वातावरणाचा काँग्रेसला फायदा झाला.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा फक्त एकच उमेदवार निवडून आला. बारामतीची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची करूनही सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची पत्नी सूनेत्रा पवार यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीत अधिक जागांची अपेक्षा करणाऱ्या अजित पवार गटाचा लोकसभेत दारुण पराभव झाला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीने स्वत:ची हवा केली होती. प्रकाश आंबेडकर हे वेगवेगळे दावे करीत होते. पण आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. अन्य मतदारसंघांतील उमेदवारांना लक्षणिय मते मिळालेली नाहीत. वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत बेदखल झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना तर अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती यश मिळणार याची उत्सुकता होती. शिवसेना ठाकरे गटाला नकली सेना म्हणून भाजपकडून हिणवले जात होते. पण निकालात शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा अधिक यश संपादन केले. शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या असून, अजित पवार गटाला फक्त एकच जागा मिळाली. या निकालावरून मतदारांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. महाविकास आघाडीला मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यश मिळाले. महायुतीला ठाणे, कोकण, उत्तर महाराष्ट्राने साथ दिली.
नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखळ बावनकुळे हे भाजपचे धुरिण नेते असलेल्या विदर्भात भाजपचा धुव्वा उडाला. मराठावाड्यातही महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी केलेले आंदोलन मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या पथ्थ्यावर पडले आहे. मुंबईतील सहापैकी चार जागा महाविकास आघाडी तर महायुतीला तीन जागा मिळाल्या आहेत. महायुतीला ठाणे, कोकण, उत्तर महाराष्ट्राने साथ दिली. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन्ही जागा महायुतीने जिंकल्या. ठाणे जिल्ह्यातील चारपैकी भिवंडी वगळता तीन जागा महायुतीने जिंकल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर या जागा भाजपने जिंकल्या आहेत.
वायव्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव ४७१४, हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने १३,२४६ मते, उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड १६,१५४ मते, अमरावतीमध्ये काँग्रेसचे वानखेडे हे १९,७३१ मतांनी विजयी झाले आहेत. शरद पवार गटाने लढलेल्यापैकी तब्बल ८० टक्के (१०पैकी आठ) जागा जिंकल्या आहेत. १७ जागा लढविलेल्या काँग्रेसने १३ जागा जिंकल्या असून विजयाचा दर ७५ टक्के आहे. शिवसेना शिंदे गटाने १५पैकी ७ जागा (४५ टक्के) जिंकल्या. भाजपने २८ जागा लढवून केवळ ९ जागा जिंकल्या असून, भाजपचा ‘स्ट्राईक रेट’ (४० टक्के) सर्वांत कमी आहे.