मेडीकल व्यावसायिकाची ३ लाख ६७ हजाराची फसवणूक; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नामांकित मेडीकल व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून दोन जणांनी वेळोवेळी औषधी खरेदी करून सुमारे ३ लाख ६७ हजार रूपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “सुनिल रामदास भंगाळे (वय-५४) रा. ओंकार नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मेडीकल व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. भंगाळे डिस्ट्रीब्यूटर नावाने त्यांचे होलसेल औषध विक्रीचे दुकान आहे. जळगावातील जिल्हा न्यायालयाजवळील शाहू महाराज हौसींग सोसायटीत मॅक्स मेडीको हे दुकान चरणसिंग जयसिंग चव्हाण आणि मोहम्मद हानिफ शेख मेहबूब हे दोघे भागीदारीने चालवितात.

भंगाळे डिस्ट्रीब्यूटरचे मालक सुनिल भंगाळे यांचा विश्वास संपादन करून दोघांनी वेळोवेळी रोखीने व्यवहार केला. त्यानंतर उधारीने औषधी घेण्यास सुरूवात केली. नियमितपण उधारीने घेतलेले औषधांची एकुण ३ लाख ६८ हजार रूपये दोघांकडून येणे बाकी होते. सुनिल भंगाळे यांनी उधारीची रक्कम दोघांकडे मागितली असता त्यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी १ लाख ८८ हजार ६३३ रूपयांची धनादेश दिला. दरम्यान, धनादेश बँकेत टाकला असता तो वटवला गेला नाही.

त्यावर चेकची रक्कम देण्याची मागणी सुनील भंगाळे यांनी चरणसिंग जयसिंग चव्हाण आणि मोहम्मद हानिफ शेख मेहबूब यांच्याकडे केली. दोघांनी भंगाळे यांची वेळ मारून नेली. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केली असता दोघांनी सांगितले की आम्ही तुमच्याकडून मालच घेतला नाही असा खोटा बनाव केला व रक्कम देण्यास नकार दिला. सुनील भंगाळे यांनी दि.१६ जून रोजी पुन्हा दोघांची भेट घेवून उधारीच्या पैशांची मागणी केली असता दोघांनी शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील भंगाळे यांनी मंगळवारी २८ जून रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुनिल भंगाळे यांच्या फिर्यादीवरून चरणसिंग जयसिंग चव्हाण आणि मोहम्मद हानिफ शेख मेहबुब यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” पुढील तपास प्रदीप चंदेलकर हे करीत आहे.

Protected Content