दुकान खरेदी प्रकरणात दोन व्यापाऱ्यांची तब्बल ३ कोटी ७३ लाखांची फसवणूक; ४ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुकान खरेदी करून देण्यासाठी वेळोवेळी ३ कोटी ७३ लाख रुपये घेतले मात्र दुकान दुसऱ्यालाच विक्री केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यात दोन जणांची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय-५६), अनिल प्रेमचंद साहित्या (वय-४८), ममता अनिल साहित्या (वय-४६) व नितीन खुबचंद साहित्या (वय-३६) सर्व रा. मोहाडी रोड, जळगाव या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फुले मार्केटमध्ये कापड दुकान असलेले महेंद्र रोशनलाल नाथानी (५०) व त्यांचे भाऊ आनंद नाथानी यांना दुसऱ्या ठिकाणी दुकान घ्यायचे असल्याने त्यांनी बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार साहित्या यांनी गोविंदा रिक्षा थांब्याजवळ बांधण्यात येणाऱ्या संत बाबा हरदासराम कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलाच्या जागेचा सातबारा उतारा नाथानी यांना दाखवला. ही जागा मुंबई येथील राजमुद्रा रिअल इस्टेट प्रा.लि.च्या मालकीची असून त्यांनी जागा खरेदीविषयी आपल्या कंपनीशी सौदापावती झाली असून तेथे व्यापारी संकूल बांधून दुकान विक्री करणार असल्याचे सांगितले. यासाठी सौदापावती करारनामा तसेच प्रस्तावित व्यापारी संकुलाचा नकाशा दाखवला. त्यानुसार नाथानी यांनी खुबचंद साहित्या, अनिल साहित्या, ममता साहित्या व नितीन साहित्या यांची भेट घेऊन दुकान घेण्यासाठी तयारी दर्शवली. व्यवहार ठरवून झालेल्या चर्चेनुसार नाथानी यांनी ५ डिसेंबर २०१७ रोजी के.पी. इन्फ्रास्ट्रक्चरच्या खात्यावर १० लाख रुपये पाठवले. त्यानंतर नाथानी बंधूंनी वेळोवेळी एकूण तीन कोटी ७३ लाख रुपये दिले. मात्र सौदापावती करून देण्याचे टाळले.

व्यवहार पूर्ण करण्याविषयी वारंवार तगादा लावूनही उपयोग होत नसल्याने नाथानी हे ९ फेब्रुवारी २०२४ रोजी साहित्या यांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी संस्थेचा शिक्का असलेली तोंडी सौदापावती असे अपूर्ण कागदपत्रे दिले. तसेच साहित्या यांनी शिवीगाळ करत ‘तुझे पैसे देत नाही, तुझे दुकान मी दुसऱ्याला विकून टाकले’ असे सांगत बाहेर काढून दिले. ही दुकाने साहित्या यांनी दुसऱ्याला विकल्याची माहिती नाथानी यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून मि‌ळवली असता ही बाब खरी निघाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content