जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथे बैल बांधण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला ४ जणांनी लोखंडी वस्तू डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली, तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोन जणांना देखील मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. या संदर्भात सोमवारी १० फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्ञानेश्वर रमेश मराठे वय-४२, रा. मनारखेडा ता.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता त्यांचा बैल बांधण्याच्या कारणावरून गावात राहणारे निंबाजी पजई, सुरेश पजई, सुरेश भराडे आणि हिरामण भराडे या चौघांनी लोखंडी वस्तू डोक्यात टाकून मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले योगेश निंबाळकर आणि दिलीप निंबाळकर यांना देखील लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. दरम्यान याप्रकरणी ज्ञानेश्वर मराठे यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी १० फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता संशयित आरोपी निंबा पजई, सुरेश पजई, सुरेश भराडे, हिरामण भराडे सर्व रा. मन्यारखेडा ता.जळगाव या चौघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तायडे करीत आहे.