पाणीदार माणूस व्ही.डी.पाटील !

पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता व्हि.डी.पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमित्त लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांचा विशेष लेख..

जीवनात अनेक व्यक्ती एकमेकांना भेटत असतात. त्यातील सर्वच व्यक्ती लक्षात राहतात, असे नाही. परंतू काही कायमचे लक्षात राहतात ते त्यांच्या वगळेपणामुळे व निष्ठापर्वक कार्यशैलीमुळे. अश्याच एका व्यक्तीच्या यशस्वी व असामान्य वाटचालीचा ओझरता लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न प्रस्तूत लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे.

ती व्यक्ती आहे श्री.व्ही.डी.पाटील. (सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता, तापी महामंडळ, जळगाव) एक कर्तृत्वान व दुरदृष्टीचा अभियंता आणि सृजनशिल, सदसद विवेकबुध्दीचा धनी माजी माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील त्यांचा आज जन्मदिवस यानिमित्त त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा !

सिंचन विभाग आणि व्हि.डी.पाटील हे जणू अविभाज्य घटक म्हणता येईल. पत्रकार म्हणून त्यांना जेव्हापासून ओळखतो तेव्हापासून त्यांच्यातील कर्तव्यतत्पर, नावीन्याचा ध्यास घेतलेला अभियंता असाच अनुभव मला नेहमी आला. खान्देशपुरता विचार केला तर ही व्यक्ती प्रशासकीय यंत्रणा, समाज, राजकारणी, शेतकरी आदी सर्वच घटकात सर्वमान्य म्हणून परीचीत आहे. खान्देशमधील सिंचन प्रकल्पाचे शिल्पकार म्हणून मी त्यांना संबोधणार नाही, परंतू विविध सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा आहे हे मान्य करावे लागेल. नवनवीन संकल्पना व सिंचनप्रकल्पाच्या मान्यतेसाठी त्यांनी खान्देशातील नेते मंडळीचा खूबीने केलेला वापर, विलक्षण असाच आहे. तसेच सिंचनक्षेत्रातील अभियांत्रिकी ज्ञानासह त्यांच्या कल्पकतेचा सद्उपयोग खान्देशमधील राजकीय मंडळींनी आपापल्या तालुक्यातील सिंचनप्रकल्पाच्या उभारणीसाठी मोठ्या हिरीरीने केल्याचे दिसून येते. राजकारणी आणि शासकीय अभियंता यांच्यातील समन्वयाचा व विश्वार्हतेचा असा मजबूत बंध दुर्मिळच म्हणावा लागेल.

विविध सिंचनप्रकल्पांच्या उभारणीच्या माध्यमातून सामाजिक नेते, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी यांच्याशी असलेलं परस्पर विश्वासाचं नातं, वर्षानुवर्षे जोपासणारे व्यक्ती म्हणून त्यांचा लौकीक मान्य करावा लागेल. खान्देशच्या सिंचन विकासातील माईंल स्टोन असे त्यांना संबोधल्यास अतिशोक्तीचे ठरणार नाही. तत्कालीन नेते बाळासाहेब मधुकरराव चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी मंत्री रोहीदास पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री सतिशअण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर तर आतापर्यंतचे विविध पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी यांच्याशी सिंचनक्षेत्राच्या प्रश्नाबाबत असलेले नाते नेहमी जिव्हाळ्याचे, आत्मसन्मानाचे व पारदर्शक असल्याचे दिसून येते. असा लौकीक व लोकमान्यता असणारे ते खान्देशातील पहिलेच अधिकारी अथवा अभियंते असतील. त्यांनी सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी केलेली धडपड ही त्यांच्या बौध्दीक कौशल्याचा परिचय देणारी आहे.

शालेय जीवनापासून ते अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शिक्षण मेरीटमध्ये संपादन करणारे व्ही.डी.पाटील, सिंचन क्षेत्रातही मेरीटोरीयस ठरले हे विशेष. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला मेगा रिचार्ज, बोदवड उपसा जलसिंचन आणि जामनेरमधील कमानी तांडा हे महत्वकांक्षी प्रकल्प त्यांच्या दुरदृष्टीसह अभियांत्रिकी ज्ञानाचा परीपाक म्हणता येईल. अधिक्षक अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते सिंचन प्रकल्पांच्या प्रश्नांसाठी आपले योगदान सदैव देत आहे. अशा या बहुगुणी सर्व समावेशक सामाजिक, प्रशासकीय व्यक्तीमत्वाला खूप खूप शुभेच्छा !

– सुरेश उज्जैनवाल

Protected Content