शेठ ला.ना. विद्यालयात पर्यावरणपूरक दिवाळी साजरी; फटाके मुक्तीची घेतली शपथ


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी आकर्षक आणि पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले तसेच फटाके मुक्तीची शपथ घेऊन स्वच्छ, शांत आणि प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचा संकल्प केला.

शुक्रवार ( १७ ऑक्टोबर ) रोजी सकाळ विभागात आयोजित या विशेष कार्यक्रमात एकूण ६० विद्यार्थ्यांनी चित्रकला शिक्षिका नीलिमा सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संकल्पनांवर आधारित रंगीबेरंगी आकाशकंदील तयार केले. या कंदिलांमध्ये पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून सृजनशीलतेचा सुंदर नमुना विद्यार्थ्यांनी साकारला. शाळेच्या परिसरात हे आकाशकंदील लावून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, तसेच शिक्षक सोमनाथ महाजन आणि नीलिमा सपकाळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे यांनी दीपावलीतील विविध दिवसांचे महत्त्व स्पष्ट करताना फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी, वायू, जल आणि माती प्रदूषणाच्या गंभीर परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना फटाके टाळून शांत आणि पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले.

मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना फटाके मुक्तीची शपथ दिली आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तर ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ महाजन यांनी फटाक्यांवरील वायफळ खर्च टाळून त्याऐवजी चांगली पुस्तके आणि उपयुक्त वस्तू खरेदी करून स्वतःचा विकास साधण्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नीलिमा सपकाळे, हिम्मत काळे, गौरव देशमुख, आनंद पाटील, किशोर माळी तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.