सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आज सोमवारी (१३ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात जिल्हाभरातून तब्बल पंधराशे ते दोन हजार निवृत्त कर्मचारी सहभागी झाले. सकाळी जळगाव बस स्थानकावर मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या हक्कासाठी आवाज उठवला.

मोर्चाच्या प्रारंभी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांना निवेदन सादर केले. त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने व वाहतूक नियमांचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेत संघटनेचे नेते सुरेश चांगरे, योगराज पाटील आणि सुभाष जाधव यांनी उपस्थितांना संबोधित केले. वक्त्यांनी शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.

मोर्चादरम्यान “कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांचे प्रश्न शासनस्तरावर पोहोचविण्याचे आश्वासन दिले.

सभेत घेतलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे वाढीव कामाचे तास कमी करावेत, फॅमिली पास सुविधेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसला निशुल्क प्रवास देण्यात यावा, वाढीव पेन्शन मंजूर करण्यात यावी, थकबाकी रक्कम तत्काळ देण्यात यावी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विशेष समिती गठित करून तिचा अहवाल लागू करणे बंधनकारक करावे, असे मागण्यांमध्ये नमूद करण्यात आले.

या निवेदनप्रसंगी संघटनेचे सचिव सुरेश चांगरे, योगराज पाटील, सुनील पाटील, सुनील बडगुजर, रमेश सपकाळे, गुलाब शेख, अरुण साळुंखे, अमृत पाटील, विलास कदम, अशोककुमार गाढे, दिलीप सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, बी.सी. महाजन आणि भगवान ब्रहमे यांसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.