
सावदा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी : विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी स्थळी अखंड 160 वर्षांपासून चालत आलेली ग्रंथराज ज्ञानेश्वरी सेवा व माऊली पालखी सोहळ्याची परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे. या पवित्र घराण्यातील थोर संत पूज्य विष्णू ज्ञानेश्वर चक्रांकित महाराज यांच्या द्वितीय पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र वाराणसी (काशी) येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आले या सोहळ्यात फैजपूरचे नरेंद्र नारखेडे हे देखील सहभागी झाले होते.

या सोहळ्याच्या समारोपप्रसंगी सनातन हिंदू धर्माचे जेष्ठ मार्गदर्शक, धर्मसभेतील निर्णायक अधिकार असलेले आणि श्रीराम मंदिर अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठा मुहूर्त निश्चित करणारे पूज्य वेदांत चक्रवर्ती, वेदशास्त्र संपन्न गणेश्वर शास्त्री द्राविड स्वामी तसेच त्यांचे बंधू पूज्य वेद चक्रवर्ती विश्वेश्वर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी त्यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्याचा आणि तब्बल दोन तासांचा सहवास लाभण्याचा अनमोल योग फैजपूरचे नरेंद्र नारखेडे यांना लाभला. चारही वेदांचे पवित्र पठण श्रवण करण्याचीही संधी उपस्थितांना मिळाली. यावेळी काशी क्षेत्रातील अनेक वेदपारंगत ब्रह्मवृंद व संत मंडळींची उपस्थिती होती. हा अद्वितीय योग पूज्य चक्रांकित बाबा सकल संतांचा आशीर्वाद आई-वडिलांची पुण्याई तसेच परिवार, मित्र व सहकाऱ्यांच्या शुभेच्छा यांमुळे प्राप्त झाल्याचे नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले. त्यांनी उपस्थित सर्व भाविक, संतवर्ग आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानले



