Home उद्योग महावितरण कृती समितीने ७२ तासांचा संप २४ तासानंतर केला स्थगित

महावितरण कृती समितीने ७२ तासांचा संप २४ तासानंतर केला स्थगित


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : महावितरणमधील कृती समितीने पुकारलेला ७२ तासांचा संप केवळ २४ तासानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्यवस्थापनाने केलेल्या सकारात्मक आवाहनानंतर आणि आगामी वाटाघाटी निश्चित झाल्यामुळे घेण्यात आला.महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने प्रसिद्ध पत्राद्वारे कळविले आहे.

महावितरणचे संचालक (संचलन) व संचालक (मा.सं.) यांनी संघटनांना केलेल्या आवाहनाचा आदर राखून, व्यवस्थापनाने पत्र क्र. ३२८९१ नुसार गोषवाऱ्यात सुधारणा करण्यास सहमती दर्शवली. तसेच, दि. १४ व १५ ऑक्टोबर रोजी कृती समितीतील संघटनांसोबत वाटाघाटी करण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत.  यासोबतच कामगार आयुक्तांनी कन्सिलिएशन प्रोसिडिंग दरम्यान संप तातडीने थांबवण्याचे आदेश दिल्याने, कृती समितीतील सातही संघटनांनी एकमताने संप तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे महावितरणच्या सेवांमध्ये नियमितता परत येणार असून, पुढील चर्चेत मागण्यांवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या सहभागी संघटना महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर फेडरेशन सरचिटणीस कृष्णा भोयर, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ महामंत्री अरुण पिवळ, सबॉर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन सरचिटणीस संतोष खुमकर, महाराष्ट्र वीज कामगार काँग्रेस (इंटक) मुख्य महासचिव दत्तात्रेय गुट्टे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सरचिटणीस संजय मोरे, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर युनियन सरचिटणीस पी. के. उके, तांत्रिक कामगार युनियन रजि. नं. ५०५९ सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे सांगितले आहे.


Protected Content

Play sound