जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने जामनेर शहरात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात 681 श्री सदस्यांनी सहभाग नोंदवत शहर स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
शहरातील प्रमुख रस्त्यांसह सरकारी इमारती, आयटीआय कॉलेज, विश्रामगृह, सरकारी हॉस्पिटल, तहसील कार्यालय, बसस्थानक, न्यायालय परिसर आणि अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत 12 ट्रॅक्टर व 7 मालवाहू रिक्षांच्या साहाय्याने एकूण 10.37 टन कचरा संकलित करण्यात आला. त्यात 3.520 टन ओला आणि 6.850 टन सुका कचरा होता. संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट ओझर रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंड येथे लावण्यात आली.
स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी नितीन बागुल, महेंद्र बाविस्कर, आतिश झाल्टे, जितेंद्र पाटील, डॉ. प्रशांत भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे जामनेर शहर अधिक स्वच्छ आणि सुशोभित झाले असून, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या महास्वच्छता अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.