
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील गडखांब गावाजवळ शनिवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी ७ वाजता झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका खासगी लक्झरी बस आणि दुचाकी यांच्यात हा विचित्र अपघात झाला. या प्रकरणी रात्री उशिरा अमळनेर पोलीस ठाण्यात बसचालकावर निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव दिनेश सदाशिव पाटील (वय २६, रा. गडखांब, ता. अमळनेर) असे आहे. दिनेश पाटील हा तरुण त्याची दुचाकी (एमएच १९ सीपी २९८७) ने गडखांबजवळून जात असताना, समोरून चोपडाकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने (एमएच १९ इएम ९०६३) त्याला जोरदार धडक दिली.
प्राथमिक माहितीनुसार, बसचालक चुनीलाल सुभाष बडगुजर (रा. चोपडा) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे बस चालवल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दिनेश पाटील याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर गडखांब परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मृतक दिनेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून, विनोद पाटील यांनी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात खासगी लक्झरी बसचालक चुनीलाल बडगुजर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त बस आणि दुचाकी ताब्यात घेतल्या असून, बसचालक चुनीलाल बडगुजर याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विनोद भोई हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



