जळगाव प्रतिनिधी | गेल्या दोन महिनाभरापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपास कारणीभूत असल्याचे कारण सांगत जळगाव विभागाने पहिल्यांदाच कडक कारवाई करत २२ कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेतून बडतर्फ केले आहे.
गुरुवार, दि. ४ नोव्हेंबर २०२१ पासून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने सुरु केलेल्या संपात २२ कर्मचाऱ्यांची अग्रेसर भूमिका असल्याचे कारण संगत एसटी महामंडळाने कारवाई केली आहे. या २२ कर्मचाऱ्यांपैकी ८ कर्मचारी जळगाव आगारात कार्यरत असून संघटनेने यापूर्वीच नोटीस मागे घेतल्यावरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे.
अगोदर निलंबित केलेल्या या कर्मचाऱ्यांना अनेकदा आपली बाजू मांडण्याची संधी देऊनही त्यांनी दुखवट्यात असल्याचे कारण सांगून प्रशासकीय चौकशीस नकार दिला होता. यावर एसटी प्रशासनाने आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये अशी नोटीस त्यांना बजाविली होती मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फची कारवाईबद्दल परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत बोलतांना, “एसटीच्या बडतर्फची कारवाई झाल्यावर पुन्हा एक प्रक्रिया असून आम्ही लगेच बडतर्फीची कारवाई मागे घेऊ शकणार नाही. कारण आम्ही कारवाया मागे घेत असतानाही कामगार कामावर येत नाही. ज्याप्रमाणे कामगारांप्रती आमचं दायित्व आहे तसंच जनतेप्रतीही आहे. त्यामुळे सरकार म्हणून हातावर हात ठेवून आम्ही बसू शकत नाही. ही कारवाई ताबडतोब मागे घेणार नाही मात्र एसटी पूर्ण क्षमतेने सुरु होईल तेव्हा पुढच्या कारवायांसंबंधी निर्णय घेतला जाईल” अशी माहिती दिली.