पहूर येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिरात २१८ रुग्णांची तपासणी 


पहूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पहूर येथे आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहर पत्रकार संघटना आणि हार्ट प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल २१८ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संदीप भारुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.

या शिबिराचे आयोजन डॉ. रविंद्र बडगुजर यांच्या आई मल्टीस्पेशालिटी डे केअर सेंटर, पहूर येथे रविवारी करण्यात आले होते. पहूर पंचक्रोशीतील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेत आरोग्याबाबत जागरूकतेचा परिचय दिला. डॉ. भारुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “हृदयविकाराची लक्षणे सौम्य वाटली तरी दुर्लक्ष केल्यास धोका वाढू शकतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी वेळेवर निदान व उपचार गरजेचे आहे.”

शिबिरात सहभागी रुग्णांची ब्लड प्रेशर, ईसीजी, रक्त तपासणी आदी प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या. काही रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना डॉ. भारुडे यांच्याकडून आवश्यक मार्गदर्शनही मिळाले. प्रारंभी डॉ. भारुडे यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या शिबिराच्या आयोजनात शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर, उपाध्यक्ष जयंत जोशी, सचिव गीता भामेरे, माजी अध्यक्ष रवींद्र लाठे यांच्यासह मनोज जोशी, रवींद्र घोलप, ईश्वर हिवाळे, डॉ. रवींद्र बडगुजर, डॉ. जलाल शेख, रवींद्र पाटील, उमर मो. रफिक, सिद्धार्थ लोढा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच पहूर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन भडांगे आणि पहूर केमिस्ट असोसिएशनचे सहकार्यही उपक्रमाला लाभले.

या प्रसंगी उपसरपंच राजू जाधव, अशोक पाटील, गजानन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. एकूणच या आरोग्य शिबिरातून ग्रामस्थांमध्ये हृदयरोगाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.